“Book Descriptions: पिंजऱ्याचा तळ गंजलेल्या लोखंडी पट्ट्याचा होता. खूप कष्टानं त्यांना आपली बैठक एखाद दुसरा इंच हलवता येत होती. पण त्याआधी दातांखाली ओठ दाबावे लागायचे. कारण सुतासुताची हालचाल म्हणजे असंख्य सुयांची टोचणी. पण हालचाल आवश्यक होती. इंचभर तरी हालचाल आवश्यक होती. स्वतःची खात्री पटवून घ्यायला हवी होती, की आपण अजून जिवंत आहोत... एखाद्या मृतदेहात वावरणारा पिशाच्चरूपी आत्मा नाही आहोत. आणि जराशी हालचाल झाली की सगळा पिंजराच झोके खायला लागायचा. कर्रर्र-कर कर्रर्र... कर... वरच्या अंधारात खूप उंचीवरच्या छपराला साखळी जोडलेली असावी. पण ते त्यांच्या दृष्टीच्या मर्यादेपलीकडचं होतं... याव्यतिरिक्त त्यांना मोठ्या कष्टानं का होईना, पण आणखी एक हालचाल करता येत होती. दोन्ही हात उचलून तोंडापर्यंत नेता येत होते. अर्थात हे शक्य नसतं तर ते जिवंत राहूच शकले नसते. कारण मग ती जख्खड म्हातारी त्यांचं खाणंपिणं घेऊन आल्यावर त्यांना अन्नपाणी कसं घेता आलं असतं? आणि अन्नपाण्याचा नुसता विचार मनात येताच कोरड्या पडलेल्या तोंडात लाळेचा ओलावा आला; खंगलेल्या पोटाच्या खळगीत भुकेची कळ उठली.” DRIVE