“Book Descriptions: इतिहासातील थोर पुरुषांना वेठीस धरून स्वार्थ साधण्याचा खेळ आपल्या देशात वर्षानुवर्ष सुरू असल्यामुळेच या थोर पुरुषांची नेमकी ओळख करून घेणं जरुरीचं असतं. कारण इतिहासाचं विकृतीकरण करून या थोर पुरुषांची खरं तर बदनामीच झालेली असते. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ साम्यवादी विचारवंत गोविंद पानसरे यांनी `शिवाजी कोण होता?' हे पुस्तक लिहून फार मोठी कामगिरी २२ वर्षांपूर्वीच बजावलेली आहे. खरं तर हे पुस्तक नव्हेच ती एक छोटेखानी, अवघ्या ७४ पानांची पुस्तिका आहे. पण त्या पुस्तकातून पानसरे यांनी उभं केलेलं छत्रपती शिवरायांचं व्यक्तिमत्त्व, हे कोणाला सातशे पानं लिहून जमणार नाही, इतकं प्रभावी आहे.
छत्रपतींविषयी समाजात वेगवेगळय़ा प्रकारचे गैरसमज पसरवण्याचं काम सातत्यानं आणि गेली अनेक वर्षं केलं जात आहे. शिवरायांच्या हयातीतच त्यास प्रारंभ झाला होता, ही बाब तर सर्वश्रुतच आहे. पण पानसरे यांनी त्या सर्व समज-गैरसमजांना सज्जड पुराव्यानिशी छेद देत, त्यातून हा `जाणता राजा' कसा सर्व समाजाचा आणि विशेषत: `आम आदमी'चा राजा होता, ते दाखवून दिलं आहे.” DRIVE